Chikkodi

चिक्कोडीत गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी एएनपीआर कॅमेरे बसवणार

Share

चिक्कोडी आणि संपूर्ण जिल्हाभरात चोऱ्यांच्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि गुन्हेगारीवर लक्ष ठेवण्यासाठी अत्याधुनिक ‘एएनपीआर’ कॅमेरे बसवले जात असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख रामराजन यांनी दिली आहे.

चिक्कोडी येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्ह्यातील मुख्य रस्ते आणि महत्त्वाच्या नाक्यांवर बसवले जाणारे हे कॅमेरे वाहनांच्या नंबर प्लेट्स स्वयंचलितपणे स्कॅन करतील. यामुळे कोणताही गुन्हा करून पळून जाणाऱ्या वाहनांचा माग काढणे पोलिसांना सोपे होणार आहे. सीमाभागातील हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी लवकरच अतिरिक्त सीसीटीव्ही यंत्रणाही कार्यान्वित केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील बेकायदेशीर सावकारी आणि मीटर व्याज धंद्याबाबत बोलताना, पीडित नागरिकांनी कोणत्याही भीतीशिवाय पुढे येऊन तक्रार दाखल करावी, असे आवाहन त्यांनी केले. अशा प्रकरणांमध्ये तक्रार येताच संबंधितांवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

कमी कालावधीत पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळ्यांवरही पोलिस प्रशासनाची करडी नजर आहे. यासोबतच, चिक्कोडी शहरातील वाढती वाहतूक कोंडी पाहता प्रमुख चौकांमध्ये लवकरच ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा उभारण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पोलिस प्रमुख रामराजन यांनी दिली.

Tags: