सुरक्षित अन्नधान्य साठवणूक आणि वितरणाच्या बाबतीत भारतीय अन्न महामंडळाने कर्नाटकात उत्कृष्ट कामगिरी केल्याचे सांगत राज्यस्तरीय सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा खासदार ईरण्णा कडाडी यांनी महामंडळाच्या कार्याचे कौतुक केले आहे.



बेळगाव येथील फेअरफील्ड मॅरियट हॉटेलमध्ये आयोजित भारतीय अन्न महामंडळाच्या राज्यस्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत चालू आर्थिक वर्षातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. गेल्या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आणि पीएम पोषण यांसह विविध योजनांतर्गत राज्यात ५२.९१ लाख मेट्रिक टन अन्नधान्याचे यशस्वी वितरण करण्यात आले असून, रेल्वेद्वारे ५४.५४ लाख मेट्रिक टन तांदूळ आणि गव्हाची सुरक्षित वाहतूक करण्यात आल्याची माहिती खासदार कडाडी यांनी दिली.



बैठकीनंतर खासदारांनी बेळगाव तालुक्यातील बेनकनहळ्ळी येथील एफसीआयच्या भव्य गोदामाला भेट देऊन पाहणी केली. सध्या राज्यातील ६१ गोदामांच्या माध्यमातून १०.६८ लाख मेट्रिक टन साठवणूक क्षमता उपलब्ध असून, पीपीपी तत्त्वावर अतिरिक्त २.४५ लाख मेट्रिक टन क्षमतेची नवीन गोदामे उभारण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रसंगी एफसीआयचे सरव्यवस्थापक बी. ओ. महेश्वरप्पा, सहायक सरव्यवस्थापक रमेश नायक आणि उपसंचालक मल्लिकार्जुन नायक उपस्थित होते.




Recent Comments