Belagavi

बेळगावात गुरुदेव रानडे यांच्या समग्र ग्रंथसंपदेचे प्रकाशन

Share

बेळगाव येथील ‘अकॅडमी ऑफ कम्पॅरेटिव्ह फिलॉसॉफी अँड रिलिजन’ (एसीपीआर) संस्थेच्या शताब्दी महोत्सवाचा समारोप आणि गुरुदेव डॉ. आर. डी. रानडे यांच्या २८ पुस्तकांचे प्रकाशन येत्या २९ जून रोजी होणार असल्याची माहिती संस्थेचे मानद सचिव एम. बी. जिरली यांनी दिली.

बेळगावमधील हिंडवाडी येथील गुरुदेव रानडे मंदिर आणि टिळकवाडीतील जीआयटी कॉलेजच्या के. के. वेणुगोपाल सभागृहात २९ जून रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ८:३० वाजता भव्य ग्रंथदिंडीने या सोहळ्याला सुरुवात होईल. केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंग शेखावत या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते शताब्दी सभागृहाची पायाभरणी केली जाईल. अखिल भारतीय व्यवस्था प्रमुख मंगेश भेंडे यांचे समारोपपर भाषण होईल. या सोहळ्यात डॉ. रानडे यांच्या विचारसरणीवर आधारित २८ पुस्तकांच्या महासंपुटाचे विमोचन केले जाईल, असे एम. बी. जिरली यांनी म्हटले.

या सोहळ्याला माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, खासदार ईरण्णा कडाडी, आमदार अभय पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकारिणी सदस्य अरविंदराव देशपांडे, डॉ. रानडे यांचे नातू दीपक आपटे आणि अतुल जैन उपस्थित राहणार आहेत. तसेच विविध विद्यापीठांचे कुलगुरू डॉ. सी. एम. त्यागराज, डॉ. विष्णुकान्त चटपल्ली, डॉ. आनंद देशपांडे आणि सुधीर व्ही. गणाचारी यांचीही प्रमुख उपस्थिती असेल.

एसीपीआरचे अध्यक्ष अशोक निंबरगी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला उपमहापौर हनुमंत कोंगाळी उपस्थित होते.

Tags: