Belagavi

बेळगावात अबकारी अधिकाऱ्यांवर ‘ईडी’ची मोठी कारवाई

Share

बेळगावात अबकारी विभागाचे अतिरिक्त आयुक्त मंजुनाथ यांच्या घरावरील छाप्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) तपास तीव्र केला आहे. आता मंजुनाथ यांचे निकटवर्तीय मानले जाणारे चिक्कोडीचे अबकारी डीवायएसपी विश्वनाथ गाणिगेर यांच्या घरावरही ‘ईडी’ने छापा टाकला आहे.

अबकारी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कथित बेकायदेशीर आर्थिक व्यवहाराप्रकरणी ‘ईडी’ने राज्यभरात शोधमोहीम सुरू ठेवली आहे. बेळगाव शहरातील बसव कॉलनी येथील डीवायएसपी विश्वनाथ गाणिगेर यांच्या निवासस्थानी ‘ईडी’चे पथक दाखल झाले असून महत्त्वाची कागदपत्रे तपासली जात आहेत.

यापूर्वी ‘ईडी’ने अबकारी अतिरिक्त आयुक्त मंजुनाथ आणि तुमकूरचे अबकारी एसपी सतीश कागली यांच्या घरावर छापे टाकून खळबळ उडवून दिली होती. आता मंजुनाथ यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांनाही या कारवाईचा फटका बसत आहे.

या छाप्यादरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रे आणि बँक खात्यांचे तपशील हाती लागल्याची सूत्रांची माहिती आहे. ‘ईडी’च्या या लागोपाठच्या कारवायांमुळे अबकारी विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

Tags: