विजापूर उपविभागाच्या पोलिसांनी कोलार नाक्याजवळ पहाटेच्या सुमारास केलेल्या कारवाईत तब्बल १ कोटी ३६ लाख रुपयांची बेकायदेशीर गोव्याची दारू जप्त केली आहे. गांडूळ खताच्या पोत्यांखाली लपवून ही दारू गोव्याहून महाराष्ट्रातील सोलापूरकडे एका ट्रकमधून नेली जात होती.

जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या दारूची किंमत गोव्यात सुमारे ७४.६८ लाख रुपये असली, तरी कर्नाटकच्या बाजारमूल्यानुसार ती १ कोटी ३६ लाख ८२ हजार ८८० रुपये होते. पोलिसांनी दारूसह वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक जप्त केला आहे.

या प्रकरणी ट्रक चालक श्रीनिवास मीसी (रा. गदग), हुसेनसाब मुल्ला (रा. विजापूर), सिद्धराम डाॅले (रा. सोलापूर) आणि बसवराज भजंत्री (रा. विजापूर) या चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींकडे दारू वाहतुकीचे कोणतेही वैध परवाने आढळले नाहीत.

तपासादरम्यान समोर आले आहे की, मुख्य सूत्रधार चालकांना गुगल लोकेशन पाठवून ट्रक कुठे थांबवायचा याचे निर्देश देत होते. तिथून पुढे दुसरा चालक तो ट्रक घेऊन जाणार होता. या गुंतागुंतीच्या पद्धतीमुळे ही दारू नेमकी कोणाकडे पोहोचवली जाणार होती, याचा शोध पोलीस घेत आहेत.

या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षकांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक रामनगौडा हट्टी, डीएसपी नागराज जे. आणि जलनगर पोलीस ठाण्याचे पीएसआय महेश संख यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.


Recent Comments