सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांचे मेव्हणे तथा बेळगावचे अतिरिक्त अबकारी आयुक्त वाय. मंजुनाथ यांच्या निवासस्थानांवर अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी छापे टाकले आहेत. बेंगळुरूमधील एका अपार्टमेंटसह बेळगाव, म्हैसूर आणि अरसीकेरे अशा एकूण सहा ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.

अवैध आर्थिक गैरव्यवहार आणि बेनामी संपत्तीच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली असून, वाय. मंजुनाथ यांच्याशी संबंधित विविध ठिकाणांवर कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. म्हैसूर, बेंगळुरू, हसन जिल्ह्यातील अरसीकेरे आणि अथणी तालुक्यातील आयनापूर गावातील त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरांवरही ‘ईडी’च्या पथकांनी छापे टाकले आहेत.

बळ्ळारीचे माजी खासदार देवेंद्रप्पा यांचे पुत्र असलेले वाय. मंजुनाथ यांच्यावर बेनामी नावाने जमीन, बार आणि रेस्टॉरंटच्या माध्यमातून अवैध संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे. सध्या बेंगळुरूमधील रेसकोर्स रस्त्यावरील समिट अपार्टमेंटमध्ये वाय. मंजुनाथ यांच्या उपस्थितीत कागदपत्रांची तपासणी सुरू आहे.
तपासादरम्यान बेळगाव येथील टीव्ही सेंटर परिसरातील निवासस्थानी काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे हाती लागली असून, अधिकारी त्याची पडताळणी करत आहेत. या कारवाईतून आणखी काही मोठी माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Recent Comments