कोल्हापूर जिल्ह्यातील कण्हेरी मठाचे श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या २८ जून रोजी बसवकल्याण येथे होणाऱ्या नियोजित हिंदू परिषदेला आणि त्यांच्या प्रवेशाला बसवप्रेमी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या संदर्भात संघटनांच्या वतीने बेळगावच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर करण्यात आले.

जागतिक लिंगायत महासभेचे जिल्हाध्यक्ष बसवराज रोट्टी यांनी कण्हेरी मठाच्या स्वामीजींवर गंभीर आरोप केले आहेत. स्वामीजींकडून लिंगायत महासभेच्या पूजनीय गुरूंचा आणि ज्येष्ठ नेत्यांचा अवमान केला जात असून, यामुळे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाने अशा कृत्यांवर आक्षेप घेतला असतानाही हे प्रकार सुरूच असल्याचा दावा त्यांनी केला.

महात्मा बसवेश्वरांच्या अनुभव मंटप परिसरात शराणांच्या विचारांविरुद्ध ही परिषद आयोजित केली जात असल्याने सर्व बसवप्रेमी संघटनांचा याला विरोध आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या परिषदेवर बंदी घालून कण्हेरी श्रींच्या प्रवेशावर निर्बंध घालावेत, अशी मागणी संघटनांनी केली आहे.
कण्हेरी मठाची परंपरा मुळात अवैदिक असतानाही, स्वामीजी असे उपक्रम राबवून समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप बसवप्रेमी शंकर गुडस यांनी केला आहे. हिंदू परिषदेला आमचा विरोध नाही, मात्र बसवादी शरणांच्या तत्त्वांना आणि लिंगायत समाजाच्या भावनांना तडा जाऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.
हे निवेदन सादर करताना बसवप्रेमी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लिंगायत समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संवेदनशील विषयावर प्रशासनाने योग्य पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.


Recent Comments