विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील गोविंदपूर गावात घडलेल्या भीमातीर सहा जणांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार महेश तळवार याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गोविंदपूर गावात २९ मे रोजी जमिनीच्या वादातून ६ जणांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने कारवाई करत मुख्य आरोपी महेश तळवार याला अटक केली. मात्र, कारवाई दरम्यान आरोपीने पोलिसांवर दगडफेक करून चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आरोपीच्या पायावर गोळीबार करून त्याला ताब्यात घेतले. आरोपी महेश तळवार याला विजापूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे, असे पोलिसांनी सांगितले.

या कारवाई दरम्यान चडचण पोलीस ठाण्याचे कर्मचारी शेखर पवार आणि विजयकुमार बनसोडे हे देखील जखमी झाले असून त्यांच्यावरही जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात आतापर्यंत एकूण ३८ आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी दिली. याप्रकरणी चडचण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.




Recent Comments