Belagavi

बेळगावात सध्या तरी पाणीटंचाईचे संकट नाही: मंत्री जारकीहोळी

Share

बेळगाव जिल्ह्यात सध्या तरी पिण्याच्या पाण्याची कोणतीही टंचाई नाही, मात्र महाराष्ट्राकडून कृष्णा नदीत पाणी मिळणे कठीण असल्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील महत्त्वपूर्ण बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर सतीश जारकीहोळी यांनी जनतेला दिलासा दिला. हिडकल धरणात आगामी जुलै अखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध असून धरणात नवीन पाण्याची आवक अद्याप सुरू न झाल्यामुळे पाणी कमी असल्यासारखे वाटत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आणीबाणीच्या प्रसंगात महानगरपालिकातर्फे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असून टँकर्सची संख्या वाढवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

धरणातून धारवाडला अतिरिक्त पाणी सोडले जात असल्याचा आरोप मंत्र्यांनी फेटाळून लावला आणि केवळ उद्योगांसाठी राखीव असलेले पाणीच तिथे जात असल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्रातही सध्या परिस्थिती बिकट असल्याने तिथून कृष्णा नदीत पाणी सोडणे कठीण असल्याचे महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, बेळगाव महानगरपालिकेचे अधिकारी तळागाळातील समस्यांची योग्य माहिती देत नसल्याचे सांगत मंत्र्यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर जाहीर संताप व्यक्त केला.

Tags: