बेळगाव शहरातील येडियुरप्पा मार्गावर झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात ३० ते ३५ वयोगटातील एका अनोळखी तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात करून कारचालक घटनास्थळावरून फरार झाला असून, मृत तरुणाची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

येडियुरप्पा मार्गावरील अलारवाड ब्रिजकडून जुन्या बेळगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. एका अज्ञात कारने अतिवेगात आणि हलगर्जीपणे चालवून तरुणाला जोरदार धडक दिली, ज्यात गंभीर रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. मृत तरुण साधारण ५ फूट ७ इंच उंचीचा, मध्यम बांध्याचा आणि गव्हाळ वर्णाचा आहे. त्याच्या अंगावर पांढरा आणि निळ्या रंगाचा अर्ध्या बाह्यांचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची जीन्स आहे. विशेष म्हणजे त्याच्या उजव्या हातावर ‘आई’ आणि ‘पूजा’ असे गोंदवलेले (टॅटू) आहे.

याप्रकरणी बेळगाव उत्तर वाहतूक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तरुणाबाबत काहीही माहिती मिळाल्यास किंवा त्याचे नातेवाईक असल्यास त्यांनी तातडीने ०८३१-२४०५२७८ किंवा ९४८०८०४१०३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. या अपघातानंतर फरार चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.


Recent Comments