बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर शहरात झालेल्या बाबू भुसगोळ यांच्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना अवघ्या २४ तासांत यश आले असून, या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.


बेळगावचे पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी पत्रकार परिषदेत या संपूर्ण कारवाईची माहिती दिली. गोरक्षणमाळ भागात पूर्ववैमनस्य आणि नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीतील राजकीय वादातून बाबू भुसगोळ यांच्यावर तीक्ष्ण हत्यारे व दगडाने हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली होती. मृताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून संकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तातडीने कारवाई करत शुभम बिसूरे, अक्षय मरडी, पवन मरडी, अनिल मरडी, संदीप मरडी आणि अभिषेक अलदाळे या सहा आरोपींना अटक केली.

पोलीस अधीक्षक के. रामराजन, अप्पर पोलीस अधीक्षक आर. बी. बसरगी आणि गोकाकचे डीएसपी रवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली संकेश्वरचे पोलीस निरीक्षक गणपती कोंगणोळ्ळी आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली. या सर्व आरोपींना न्यायालयाने कोठडी सुनावली असून, तपास पथकाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी त्यांचे कौतुक केले आहे.


Recent Comments