Vijayapura

भीमा तीरावरील नरसंहारातील सुपारी किलर जेरबंद

Share

विजापूर जिल्ह्यातील भीमा तीरावरील ६ जणांच्या सामूहिक हत्याकांडातील मुख्य आरोपी आणि सुपारी किलर महेश तळवार याला पोलिसांनी थरारक चकमकीनंतर अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या आत्मरक्षणार्थ गोळीबारात आरोपी जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गोविंदपूर गावात २९ मे रोजी एकाच कुटुंबातील पाच जणांसह एकूण सहा लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या भीषण नरसंहारासाठी १५ लाख रुपयांची सुपारी घेणारा मुख्य सूत्रधार महेश तळवार गेल्या २३ दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. तो इट्टंगीहाळ गावाच्या वेशीवर लपल्याची खात्रीशीर माहिती मिळताच चडचण पोलिसांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली.

पोलिसांनी वेढा घालताच आरोपी महेश तळवार याने पळून जाण्यासाठी पोलिसांवरच जोरदार दगडफेक सुरू केली. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी शेखर पवार आणि विजयकुमार बनसोडे जखमी झाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून सीपीआय परशुराम मनगुळी यांनी आरोपीच्या उजव्या पायावर गोळी झाडून त्याला जागीच पाडले आणि ताब्यात घेतले.

या कारवाईत जखमी झालेला आरोपी आणि दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर विजापूर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भीमा तीरावर दहशत निर्माण करणाऱ्या या गुंडाला पोलीस दलाने आपल्याच शैलीत चोख उत्तर दिले असून या धाडसी कामगिरीचे जनतेकडून कौतुक होत आहे.

Tags: