बेळगाव जिल्ह्यातील पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर एम.के. हुबळी शहराजवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन आग लागल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन्ही वाहने जळून खाक झाली असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मक्याची पोती घेऊन जाणारा ट्रक आणि समोरील बाजूने येणारा दुधाचा टँकर यांच्यात जोरदार धडक झाली. धडक इतकी तीव्र होती की, क्षणार्धात दोन्ही वाहनांनी पेट घेतला आणि महामार्गावरच वाहने जळू लागली.

अपघात होताच दोन्ही वाहनांमधील चालक आणि क्लिनर यांनी प्रसंगावधान राखून बाहेर उड्या मारल्या. त्यामुळे ते किरकोळ दुखापतींवर बचावले असून मोठा अनर्थ टळला आहे.
या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
घटनेची माहिती मिळताच कित्तूर पोलीस ठाण्याचे पथक आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करून वाहनांना लागलेली आग आटोक्यात आणली, तर कित्तूर पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक पूर्ववत केली.


Recent Comments