Chikkodi

चिक्कोडीत कपड्यांच्या दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान

Share

चिक्कोडी येथील एका प्रसिद्ध कपड्यांच्या दुकानाला अचानक आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या आगीत दुकानातील लाखो रुपयांचे कपडे आणि इतर साहित्य जळून खाक झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

चिक्कोडी शहरातील गुरुवार पेठ रस्त्यावरील ‘जयश्री गारमेंट्स’ या कपड्यांच्या दुकानात नेहमीप्रमाणे काम सुरू असताना अचानक आग लागली. काही वेळातच आगीने मोठे रूप धारण केल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दुकान परिसरात आग पसरत असल्याचे पाहताच तेथे कार्यरत असलेल्या कामगारांनी तातडीने बाहेर धाव घेतली. कामगारांनी दाखवलेल्या समयसुचकतेमुळे सर्व जण सुरक्षित बाहेर पडले आणि मोठा अनर्थ टळला.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी वाहनांसह घटनास्थळी धाव घेतली. दुकानात मोठ्या प्रमाणात धूर आणि आगीचे लोळ असल्याने जवानांना आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आले.

ही घटना चिक्कोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास पोलीस करत आहेत.

Tags: