महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने आयोजित आगामी आंदोलनाविरोधात कर्नाटक रक्षण वेदिकेच्या शिवरामेगौडा गट आणि कन्नड संघटनांच्या महासंघाने बेळगाव शहर पोलीस आयुक्तांना एक निवेदन सादर करून, मराठी माणसांच्या लोकशाही मार्गाने होणाऱ्या आंदोलनाला परवानगी नाकारण्याची मागणी केली आहे.


म. ए. समितीच्या वतीने आगामी २२ आणि २७ जून रोजी आयोजित केलेल्या कायदेशीर आंदोलनावर बंदी घालण्यासाठी ‘करवे’ने पोलीस प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. या आंदोलनाला परवानगी दिल्यास तिथे येऊन म. ए. समितीच्या नेत्यांना काळे फासू, अशी वल्गना ‘करवे’चे जिल्हाध्यक्ष वाजीद हिरेकुडी यांनी केली आहे.

बेळगावात दोन्ही भाषिक सलोख्याने राहत असताना, ‘करवे’चे नेते महादेव तळवार यांनी म. ए. समितीवर जनतेत तेढ निर्माण केल्याचा जाणीवपूर्वक खोटा आरोप केला आहे. कर्नाटक सरकारच्या ६० टक्के कन्नड सक्तीच्या नियमाचा गैरफायदा घेत, सीमाभागातील मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांवर गदा आणण्यासाठीच कन्नड संघटनांकडून अशी विनाकारण कुरकुर केली जात आहे. मराठी भाषिकांची कोंडी करून त्यांचे आंदोलन दडपण्याचा हा एक जाणीवपूर्वक केलेला डाव असल्याचे स्पष्ट होत आहे.
या प्रसंगी बळराम मासेनट्टी, बाळप्पा गुडगेनट्टी यांच्यासह इतर कन्नड कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments