Chikkodi

चिकोडीत वीज खाजगीकरणाविरोधात शेतकऱ्यांचे रस्ता रोको आंदोलन

Share

केंद्र आणि राज्य सरकारच्या वीज खाजगीकरण धोरणाचा निषेध करण्यासाठी चिकोडी येथील बसव चौकात शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत भव्य आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी सुमारे अर्धा तास रस्ता रोको केला आणि मानवी साखळी निर्माण करून सरकारच्या धोरणांवर तीव्र आक्रोष व्यक्त केला.

आंदोलनाला संबोधित करताना कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष सत्यप्पा मल्लापूरे यांनी इशारा दिला की, जर सरकारने वीज खाजगीकरण लागू केले, तर आगामी दिवसांत गुर्लापूरच्या धर्तीवर उग्र आंदोलन छेडण्यात येईल. यानंतर उपविभागाधिकारी सुभाष संपगावी यांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारला निवेदन सादर करण्यात आले.

चिकोडी तालुकाध्यक्ष मनोज मनगूळी यांनी सांगितले की, सध्या भागात तीव्र दुष्काळी परिस्थिती असून शेतकरी आधीच संकटात आहेत. अशा कठीण परिस्थितीत विजेचे खाजगीकरण केल्यास शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होतील.

या आंदोलनात मल्लाप्पा अंगडी, आनंद पाश्चापूरे यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.

Tags: