बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यात सिमेंट कारखान्यामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. मुद्दापूर येथील ‘जे. के. सिमेंट’ कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुळीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी कारखान्यासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.


बागलकोट जिल्ह्यातील मुद्दापूर, निंगापूर, बोम्मण बुद्नी, मेटगुड्डा आणि हलकी या पाच गावांतील नागरिकांना या कारखान्यातील प्रदूषणामुळे विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. कारखान्यातून रात्रीच्या वेळी निघणाऱ्या धुळीमुळे पिकांचे नुकसान होत असून आरोग्य बिघडण्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी प्रशासनाला अनेकदा निवेदने देऊनही कोणतीही कारवाई न झाल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.

या सर्व प्रदुषणाच्या तक्रारी प्रलंबित असतानाच कारखान्याकडून नवीन विस्तारित घटकाची स्थापना केली जात असल्याने नागरिकांमधून विरोध होत आहे. तसेच परिसरातील दगडखाणींमधील उत्खननामुळे शेतजमिनींचे नुकसान होत असून कूपनलिकांच्या पाणीपातळीत मोठी घट झाली आहे. प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.


Recent Comments