State

विरोधी पक्षांच्या गुप्त पाठिंब्यामुळेच काँग्रेस उमेदवारांचा विजय; सतीश जारकिहोळींचा मोठा गौप्यस्फोट

Share

विरोधी पक्षांच्या मतांमुळेच काँग्रेस उमेदवारांचा विजय झाला असून मुख्यमंत्र्यांनी राज्यात पहिल्यांदाच ‘दिल्ली मॉडेल’ची रणनीती वापरल्याचा गौप्यस्फोट सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांनी केला.

बेंगळुरू येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सतीश जारकिहोळी यांनी विधानपरिषद निवडणुकीत भाजप आणि जेडीएस पक्षांतून काँग्रेसला शंभर टक्के मतदान झाल्याचे स्पष्ट केले. विरोधी पक्षांच्या आमदारांच्या पाठिंब्यामुळेच काँग्रेस उमेदवारांना अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीच्या धर्तीवर आखलेली रणनीती कर्नाटकात पूर्णपणे यशस्वी ठरली आहे. विरोधी आमदारांनी काँग्रेसला मतदान करण्यामागे त्यांचे अंतर्गत मतभेद, वैयक्तिक कामे किंवा परस्परांमधील मैत्री अशी विविध कारणे असू शकतात, असे सतीश जारकिहोळी यांनी म्हटले.

याचवेळी त्यांनी राज्यातील गॅरंटी योजनांच्या पुनर्रचना आणि मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी बोलावलेल्या बैठकीचे समर्थन केले. गॅरंटी योजनांमधून अपात्र लोकांना वगळण्याच्या सरकारच्या निर्णयामध्ये काहीही चुकीचे नाही. या योजना केवळ आपल्या राज्यातील जनतेसाठीच लागू असून, खऱ्या गरजूंना याचा लाभ मिळवून देण्यासाठी नियमांची सुधारणा करणे अनिवार्य आहे, अशी प्रतिक्रिया सतीश जारकिहोळी यांनी दिली.

Tags: