कर्नाटकच्या राजकारणात कमालीची उत्सुकता निर्माण करणाऱ्या विधान परिषदेच्या ७ जागांसाठी आज जोरदार मतदान पार पडले. रिसॉर्ट पॉलिटिक्स आणि अंतर्गत गुप्त रणनीतीनंतर, अपेक्षेप्रमाणे झालेल्या ‘क्रॉस व्होटिंग’मुळे भाजप-जेडीएस युतीला मोठा धक्का बसला आहे.

विधानसौध येथे सकाळी ९ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, मंत्री सतीश जारकीहोळी, एम. बी. पाटील, विरोध पक्षनेते आर. अशोक यांच्यासह प्रमुख नेत्यांनी दुपारपर्यंत आपला मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीत ८ उमेदवार रिंगणात असून काँग्रेसचे ४ आणि भाजपच्या २ उमेदवारांचा विजय सोपा मानला जात आहे.

खरी लढत ७ व्या जागेसाठी काँग्रेसचे विनय कार्तिक आणि जेडीएसचे के. एन. गोविंदराजू यांच्यात आहे. विजयासाठी प्रत्येकी २८ मतांची गरज असून दोन्ही बाजूंकडे संख्याबळ कमी आहे. त्यामुळे आमदारांना रिसॉर्टवर ठेवण्यासोबतच दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतांसाठी दोन्ही पक्षांनी कडक गाईडलाईन्स दिल्या होत्या.
या मतदानादरम्यान भाजप आणि जेडीएस युतीची मते फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षातून निलंबित झालेले भाजप आमदार एस. टी. सोमशेखर आणि शिवराम हेब्बार यांनी युतीचा आदेश डावलून काँग्रेसच्या बाजूने मतदान केले. मतदारसंघाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याचे सोमशेखर यांनी उघडपणे सांगितले.
दुसरीकडे, जेडीएसचे ज्येष्ठ नेते जी. टी. देवेगौडा यांनी ‘आत्मपरीक्षणाचे मत’ दिल्याचे सांगत सस्पेन्स ठेवल्याने जेडीएसच्या गोटात चिंता वाढली आहे. दरम्यान, काँग्रेसचे पाचही उमेदवार बहुमताने विजयी होतील, असा ठाम विश्वास मंत्री सतीश जारकीहोळी आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केला आहे. या अटीतटीच्या लढतीचा अंतिम निकाल संध्याकाळी ६ वाजता जाहीर होणार आहे.


Recent Comments