Belagavi

बेळगावातील शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांचे मध्यरात्री तीव्र आंदोलन

Share

बेळगावच्या संगमेश्वर नगरमधील मुलांच्या शासकीय वसतिगृहात मूलभूत सुविधांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांनी मध्यरात्री तीव्र आंदोलन केले. जेवणात वारंवार अळ्या सापडणे, पाण्याची तीव्र टंचाई आणि वॉर्डनचे दुर्लक्ष यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

वसतिगृहात वॉर्डन आले असता विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या ताटात अळ्या दिसून आल्या. यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी जेवण सोडून स्वयंपाकाची भांडी बाहेर ठेवत निषेध नोंदवला. समाजकल्याण विभागाचे तालुका अधिकारी आणि सहसंचालकांनी तातडीने घटनास्थळी यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी लावून धरली.

वॉर्डनच्या सततच्या गैरहजेरीमुळे आणि दुर्लक्षामुळेच विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत, असे विद्यार्थी राजेश लमाणी यांनी म्हटले.

घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलीस ठाण्याचे अधिकारी वसतिगृहात दाखल झाले. त्यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढून आंदोलन मागे घेण्यास सांगितले. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन या समस्या लवकरच सोडवल्या जातील, असे आश्वासन पोलिसांनी दिले. विद्यार्थ्यांची तब्येत बिघडू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णवाहिकाही पाचारण करण्यात आली होती, असे शिवय्या मठपती यांनी म्हटले.

Tags: