Belagavi

१० वर्षे लिव्ह-इनमध्ये राहून शिक्षकाने केला प्रेयसीचा खून

Share

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीला सोडून दुसऱ्या तरुणीशी लग्न करण्यास निघालेल्या प्रियकराला जाब विचारल्याने, त्याने प्रेयसीची निर्घृण हत्या करून मृतदेह महाराष्ट्रातील जंगलात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

बेळगाव तालुक्यातील वंटमूरी येथील गंगव्वा हंचिनमणी (वय २५) हिचा तिचा लिव्ह-इन पार्टनर आणि खाजगी शिक्षक बसवराज करनावर (वय ३३, रा. राजनकट्ठी, ता. हुक्केरी) याने त्याचे वडील व मामाच्या मदतीने लोखंडी रॉडने वार करून खून केला. गेल्या १० वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या बसवराजने दुसऱ्या तरुणीशी लग्न ठरवले होते, ज्याला गंगव्वाने तीव्र विरोध केला होता. याच रागातून आरोपींनी ‘विशालगड’ला फिरवण्याच्या बहाण्याने तिला कारमधून नेले आणि हत्या करून मृतदेह महाराष्ट्रातील तिलारी घाटातील जंगलात फेकून दिला. २९ मे रोजी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्यानंतर, चंदगड पोलिसांनी रस्ते आणि टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयास्पद कारचा शोध घेऊन शिक्षक बसवराजसह तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

दरम्यान, तरुण मुलीचा असा दुर्दैवी अंत झाल्याने पीडितेच्या आईचा आक्रोश अनावर झाला आहे. “मुलगी जेव्हा जेव्हा भेटायला यायची, तेव्हा सर्व काही ठीक असल्याचे सांगायची. पण तिची अशी हत्या होईल असे वाटले नव्हते,” असे म्हणत आईने आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तसेच, मृत तरुणीच्या भावानेही प्रतिक्रिया देताना सांगितले कि, महाराष्ट्र पोलीस जेव्हा घरी आले तेव्हाच बहिणीचा खून झाल्याचे समजले, आरोपींना कठोर कडक शासन झालेच पाहिजे, अशी मागणी मृत तरुणीचा भाऊ रमेश याने केली आहे.

Tags: