बेळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन गटांत झालेल्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला झाला आहे. याप्रकरणी मार्केट पोलिसांनी सर्व संशयित युवकांना ताब्यात घेतले आहे.


जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दोन गट भररस्त्यात एकमेकांशी भिडले होते. यावेळी तेथे कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी मल्लीकार्जुन गुंजीकर यांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या युवकांनी त्यांच्याशीच हुज्जत घालत त्यांना मारहाण केली. यानंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने तातडीने मार्केट पोलीस ठाण्यात अतिरिक्त कुमक मागवली.

घटनेची माहिती मिळताच मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमिर्ची आणि सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी भररस्त्यात हुल्लडबाजी करणाऱ्या युवकांना रोखले आणि त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस सध्या या सर्व युवकांची चौकशी करत असून, हा वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला, याचा तपास मार्केट पोलीस करत आहेत.


Recent Comments