बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागची महत्त्वाची बैठक पार पडली. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने येत्या २२ जून रोजी आयोजित केलेल्या कन्नडसक्ती विरोधी महामोर्चाला या बैठकीत पूर्ण पाठिंबा घोषित करण्यात आला.

बैठकीचे प्रास्ताविक करताना संघटनेचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी सीमाभागातील मराठी भाषिकांनी या मोर्चात बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांना बेळगाव पोलीस प्रशासनाकडून सातत्याने दिल्या जाणाऱ्या नोटीस आणि कारवाईचा त्यांनी तीव्र निषेध केला.

सीमाभागात पंधरा टक्क्यांहून अधिक मराठीभाषिक नागरिक राहत आहेत. असे असताना कर्नाटक सरकार स्वतःच्याच कायद्यांची पायमल्ली करत असून मराठीला डावलून कन्नडची सक्ती करत असल्याचा आरोप सरचिटणीस मनोहर हुंदरे यांनी केला. या अन्यायाविरोधात महामोर्चाच्या माध्यमातून कर्नाटक सरकारला जाब विचारला जाईल, असे त्यांनी सांगितले.
बैठकीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी स्थानिक प्रशासनाच्या भीतीने काही मराठी व्यापारी आपल्या दुकानांवर मराठी फलक लावण्यास टाळाटाळ करत असल्याबद्दल खंत व्यक्त केली. याउलट, काही कन्नड व्यापारी त्यांच्या भाषेसोबत मराठीलाही सन्मानाने स्थान देत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे व्यापाऱ्यांचा कोणताही धर्म नसून, मराठी भाषेला योग्य स्थान देणाऱ्या दुकानातूनच मराठी भाषिकांनी खरेदी व व्यवहार करावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच या मोर्चाच्या माध्यमातून मराठीची ताकद प्रशासनाला दाखवून देण्याचे स्पष्ट केले.
या प्रसंगी शिवाजी हवळाणाचे आणि रणजित हवळाणाचे यांनीही आपले विचार मांडले. बैठकीला नगरसेवक शिवाजी मंडोळकर, अशोक घगवे, सुरज जाधव, अभिजित मजुकर, निलेश काकतकर, रोहित जाधव, मोहन धाकलुचे, रोशन पाटील, प्रणय पाटील, परशराम निलजकर, प्रशांत बैलूरकर, प्रभाकर पाटील, श्रीराम पाटील, यश राव, गणेश घवारी यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments