Belagavi

अलतगेमधील हायस्कूल इमारत दुरुस्तीसाठी निधीची मागणी

Share

अलतगेमधील ब्रह्मलिंगेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी शाळा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगावमधील उद्योगपती अनिल पोतदार यांची भेट घेतली.

अलतगे हायस्कूलची इमारत जुनी आणि जीर्ण झाल्याने पावसाळ्यात वर्गखोल्यांमध्ये पाण्याची गळती होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. इमारतीच्या दुरुस्तीसह स्लॅबवरील बांधकाम, पत्रे बसविणे आणि इतर आवश्यक कामांसाठी अंदाजे १० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या कामासाठी महाराष्ट्र सरकारकडून निधी मिळावा यासाठी शाळा कमिटीच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत.

या भेटीदरम्यान अनिल पोतदार यांनी चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून या विषयात सहकार्य करण्याची विनंती केली. तसेच शाळेच्या कामासाठी स्वतःकडूनही आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या प्रसंगी संस्थेचे चेअरमन चंद्रकांत धुडूम, माजी ग्रामपंचायत सदस्य चेतक कांबळे, उमेश चौगुले, अशोक घुगरेटकर, कल्लाप्पा चौगुले, अनिल पावशे, नागेश पाटील, गणपती सुतार, बाळू दुर्गाराम पाटील, महेश पाटील तसेच गावकरी उपस्थित होते.

Tags: