Belagavi

निपाणीत लवकरच पंतप्रधान आवास योजनेच्या १०२१ घरांचे वाटप

Share

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गरीब, बेघर आणि गरजू नागरिकांना हक्काचे घर देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कोणत्याही पात्र लाभार्थ्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही आमदार शशिकला जोल्ले यांनी दिली.

निपाणी नगरपालिकेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. निपाणी नगरपालिका आणि महसूल विभागाकडून अर्जदारांची पडताळणी पूर्ण झाली असून १०२१ पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार करण्यात आली आहे. या सर्व लाभार्थ्यांना लवकरच लॉटरी पद्धतीद्वारे पारदर्शकपणे घरांचे वाटप केले जाईल. नियमांनुसार वृद्ध आणि दिव्यांग लाभार्थ्यांना तळमजल्यावरील घरांसाठी प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय आणखी २०० घरे उपलब्ध असून, गरजू नागरिकांनी आवश्यक शुल्क भरून अर्ज करावेत, असे आवाहन त्यांनी केले. तसेच विरोधकांनी निपाणीतील जनतेची दिशाभूल करू नये, आगामी काळात जनताच त्यांना चोख उत्तर देईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी पात्र कुटुंबांना हक्काचे घर मिळवून देण्याचा शब्द दिला.

या प्रसंगी तहसीलदार सुरेश मुंजे, भाजप शहराध्यक्ष राजू गुंदेशा, माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले, हाल शुगरच्या उपाध्यक्षा सुनिता पाटील, माजी नगरसेवक संतोष सांगावकर, सुनील पाटील, बंडा घोरपडे, दत्तात्रय जोत्रे, सागर मिर्जे, विजय तवळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: