Belagavi

माजी सैनिकाच्या खून प्रकरणी नऊ जणांना अटक

Share

विमा रकमेसाठी निवृत्त सैनिकाचा पत्नीने केलेल्या खून प्रकरणी आतापर्यंत नऊ जणांना अटक केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के रामराजन यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

संदीप मंजरागी जखमी असताना त्यांना उपचारासाठी घटप्रभा येथील जेजे रुग्णालयात दाखल केले होते. याच संधीचा फायदा घेत त्यांची पत्नी सुमा आणि तिचा प्रियकर पुंडलीक यांनी त्यांना विष देऊन ठार केले. या प्रकरणात आतापर्यंत पत्नी आणि प्रियकरासह एकूण नऊ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपींनी या हत्येला अपघाती मृत्यूचे स्वरूप देण्यासाठी मोठा कट रचला होता. सुरुवातीच्या एफएसएल अहवालात विष दिल्याचे स्पष्ट झाले होते, मात्र आरोपींनी आर्थिक आमिष दाखवून हा अहवालच बदलून घेतला होता. या गुन्ह्यात काही पोलीस कर्मचाऱ्यांनीही आरोपींना मदत केल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी अप्पासाहेब नायकवाडी, चन्नप्पा अडवीस्वामीमठ, नागराजु, अशोक गुजनाळ, बसवराज भस्मे आणि राहुल जोगी यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, विमा रकमेच्या वाटपावरून सुमा आणि पुंडलीक यांच्यात झालेल्या वादामुळे या हत्येचे गुपित उघड झाले. या गुन्ह्याचा तपास प्रभावीपणे पूर्ण केल्याबद्दल पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी यमकनमर्डी आणि घटप्रभा पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

Tags: