Belagavi

बेळगाव मधील क्रिकेट स्पर्धेतून वृद्धाश्रमाला आर्थिक मदत

Share

बेळगाव मधील सरदार मैदानावर पार पडलेली मर्यादित षटकांची क्रिकेट स्पर्धा सामाजिक बांधीलकीची साक्ष ठरली आहे. यासोबतच बेंगळुरू मध्ये झालेल्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावच्या तरुणाने सुवर्णपदक पटकावून सीमाभागाचा गौरव वाढवला आहे.

बेळगाव मधील सरदार ग्राउंड प्लेयर्स आणि गंगाधर पाटील यांच्या वतीने आयोजित या क्रिकेट स्पर्धेत एकूण ८ संघांनी सहभाग घेतला होता. रंगतदार अंतिम सामन्यात ‘कांतारा बॉईज’ संघाचा पराभव करून ‘एसजी स्पोर्ट्स’ संघाने विजेतेपद पटकावले. प्रकाश जाधव मालिकावीर तर सचिन साहनी सामनावीर ठरला. या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, उपविजेत्या ठरलेल्या कांतारा बॉईज संघाने आपल्याला मिळालेली संपूर्ण रोख बक्षीस रक्कम ‘शांताई वृद्धाश्रम’ येथे देणगी म्हणून देऊन समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. मुख्य अतिथी आयलन मोरे यांच्यासह शरद पाटील, रमेश गोवेकर, इम्तियाज काझी आदी मान्यवरांनी उपस्थित राहून खेळाडूंचे कौतुक केले.

याच व्यासपीठावर बेळगावच्या दुसऱ्या एका अभिमानास्पद कामगिरीचा गौरव करण्यात आला. बेंगळुरू मध्ये नुकत्याच झालेल्या या प्रतिष्ठेच्या ‘आयसीएन इंडिया’ राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावच्या हेमंत अनिल शंभुचे याने चमकदार कामगिरी केली आहे. त्याने मेन्स फिजिक्स विभागात सुवर्णपदक आणि मेन्स फिटनेस विभागात रौप्यपदक जिंकून राष्ट्रीय पातळीवर यश मिळवले. या यशाबद्दल हेमंत शंभुचे यांचा क्रिकेट स्पर्धेच्या सत्कार समारंभात मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

Tags: