Belagavi

राजकीय प्रभावाचा वापर करून ‘त्या’ तरुणीला धमकावल्याचा आरोप

Share

बेळगावमध्ये सत्तेचा आणि राजकीय प्रभावाचा वापर करून एका पीडित तरुणीला धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. लैंगिक छळाला बळी पडलेली तरुणी सध्या मृत्यूशी झुंज देत असून, या प्रकरणी काँग्रेस नेत्या आयेशा सनादी यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करून फसवणूक केल्याचा आरोप सलिम किल्लेदार याच्यावर आहे. सलिमने पीडितेच्या खाजगी फोटोंचा वापर करून तिला ब्लॅकमेलही केले होते. या प्रकरणातील आरोपी सलिम किल्लेदार याच्या बाजूने भूमिका घेत आयेशा सनादी यांनी पीडित कुटुंबाला धमकावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

न्यायाची मागणी केल्यास खाजगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी आयेशा सनादी यांनी दिली आहे. मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या कार्यालयात आणि पोलीस दलात आपला प्रभाव असून, तक्रार दाखल होऊ नये अशी ताकद आपल्याकडे असल्याचे सांगून त्यांनी दबाव निर्माण केल्याचा उल्लेख पीडितेच्या पालकांनी तक्रारीत केला आहे.

या राजकीय दबावामुळे आणि मानसिक छळामुळे पीडित तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला असून, ती सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. आयेशा सनादी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सलिम रझा सय्यद यांनी केली आहे.

Tags: