Belagavi

‘शिवम असोसिएट्स’ घोटाळ्यातील मुख्य आरोपी शिवानंद नीलणावरला अंतरिम जामीन

Share

बेळगावच्या इतिहासातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा मानल्या जाणाऱ्या ‘शिवम असोसिएट्स’च्या ४,५०० कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी शिवानंद नीलणावर याला बेंगळुरू न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

गुंतवणूकदारांना जादा व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या शिवानंद नीलणावर याला बेंगळुरूच्या ९३ व्या सिटी सिव्हिल आणि सेशन्स न्यायालयाने सशर्त अंतरिम जामीन दिला आहे. आरोपीच्या वतीने ज्येष्ठ वकील आर. जी. पाटील आणि सुधीर निर्वाणी यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने ३ लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला आहे. तसेच “कोणत्याही परिस्थितीत देश सोडून जाऊ नये, पुराव्यांशी छेडछाड करू नये आणि फरार होण्याचा प्रयत्न करू नये”, अशा कडक अटी न्यायालयाने घातल्या आहेत.

शिवानंद नीलणावर हा रिझर्व्ह बँक (RBI) किंवा सेबी (SEBI) कडून कोणतीही अधिकृत परवानगी न घेता बेकायदेशीरपणे वित्तीय संस्था चालवत होता. त्याने देशाचे रक्षण करणाऱ्या माजी सैनिकांना आणि निष्पाप नागरिकांना लक्ष्य करून, जादा व्याजाचे प्रलोभन दाखवून तब्बल ४,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली आणि फसवणूक केली. या घोटाळ्यामुळे हजारो कुटुंबे रस्त्यावर आली असून, बेळगावमध्ये लागोपाठ तक्रारी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती.

Tags: