दृढनिश्चय आणि स्पष्ट ध्येय असेल तर गरिबीवर मात करून यशाचे शिखर गाठता येते, हे हिरेकोडी गावातील एका शेतकरी कुटुंबातील युवकाने सिद्ध करून दाखवले आहे. येथील सुशांत शेखर बाळीकाई यांनी एमबीबीएस पदवी पूर्ण केली असून, हिरेकोडी गावाच्या इतिहासातील पहिले डॉक्टर होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला आहे.

अत्यंत सामान्य आणि गरीब पार्श्वभूमी लाभलेले सुशांत हे सुरुवातीपासूनच शिक्षणात आघाडीवर होते. डॉक्टर बनून समाजसेवा करण्याचे स्पष्ट ध्येय त्यांनी बाळगले होते. समोर आलेली आर्थिक आणि सामाजिक आव्हाने धाडसाने पेलत त्यांनी आज हे उत्तुंग यश संपादन केले आहे. त्यांचे हे अपूर्व यश संपूर्ण हिरेकोडी गावासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरले आहे.

गरीब कुटुंबात जन्म घेऊनही खचून न जाता, निष्ठा आणि कठोर परिश्रमाने पुढे गेल्यास काहीही साध्य करता येते, हे सुशांत यांनी आपल्या कर्तृत्वातून आजच्या तरुण पिढीला दाखवून दिले आहे, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
गावातील पहिले डॉक्टर म्हणून नावारूपास आलेल्या सुशांत शेखर बाळीकाई यांचे गावातील समस्त नागरिकांनी भरभरून अभिनंदन करत अनेक स्तरावर त्यांचे कौतुक होत आहे.


Recent Comments