Belagavi

फेसबुक फ्रेंड्स सर्कल ठरले वृद्ध दांपत्याचा आधार

Share

बेळगावमधील एका वृद्ध दांपत्याचे मुलाचे छत्र हरपल्यानंतर अर्धांगवायूने आजारी असलेल्या पतीसह अत्यंत हलाखीचे दिवस कंठणाऱ्या वृद्ध महिलेला बेळगावच्या फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या टीमने मदत करत आधार दिला आहे.

बेळगावमधील शहापूर येथील जेड गल्लीत एका छोट्या भाड्याच्या खोलीत अंजना सावंत आणि अर्धांगवायूमुळे अंथरुणाला खिळलेले रामचंद्र सावंत हे वृद्ध दांपत्य राहत आहे. हे दांपत्य सध्या तीव्र आर्थिक टंचाई, आजारपण आणि एकाकीपणाचा सामना करत आहे. आधार देणारा एकुलता एक मुलगा आजारपणामुळे दगावला असून वृद्धापकाळ मानधनही बंद झाल्याने या दांपत्यावर जेवणाची आणि औषधांची भ्रांत निर्माण झाली होती.

या दयनीय परिस्थितीची माहिती मिळताच बेळगाव फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष आर. दरेकर आणि आरती सुभेदार यांनी तात्काळ धाव घेतली. त्यांनी वृद्ध दांपत्याच्या घरी भेट देऊन जीवनावश्यक किराणा सामान आणि वैद्यकीय उपचार मिळवून दिले. संकटाच्या काळात देवदूतासारख्या धावून आलेल्या या टीमच्या मानवी कार्याचे बेळगावमधील नागरिकांमधून कौतुक होत आहे.

Tags: