Belagavi

माजी सैनिक हत्येचा तपास भरकटवणारा पोलीस कर्मचारीच मुख्य सूत्रधार

Share

माजी सैनिकाच्या हत्याकांडाचे खरे पुरावे नष्ट करण्यासाठी बेळगाव पोलीस आयुक्तालय कार्यालयातील कर्मचारीच आरोपींच्या पाठीशी उभा राहिल्याचे यमकनमर्डीचे सीपीआय जावेद मुशापुरे यांच्या तपासात उघड झाले आहे.

हुक्केरी तालुक्यातील घोडगेरी येथील माजी सैनिक संदीप मांजरी यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करत असताना सीपीआय जावेद मुशापुरे यांना पोलीस दलातीलच काळा चेहरा समोर आणण्यात यश आले आहे. संदीप यांच्या निधनानंतर चतुर पत्नी सुमा आणि तिचा प्रियकर पुंडलिक यांनी रुग्णालयातील सलाईनमधून कीटकनाशक देऊन संदीप यांची हत्या केली होती. हा गुन्हा लपवण्यासाठी त्यांनी थेट कमिशनर ऑफिसमधील कर्मचाऱ्याची मदत घेतली होती.

पोस्टमार्टम अहवालात विषाचा अंश सापडू नये म्हणून या पोलीस कर्मचाऱ्याने मुख्य भूमिका बजावली होती. आपल्या पदाचा आणि प्रभावाचा गैरवापर करून त्याने फॉरेन्सिक लॅब (FSL) मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पूर्णपणे मॅनेज केले होते. संपूर्ण केस भरकटवण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने पद्धतशीर कट रचला होता. सध्या सीपीआय जावेद मुशापुरे यांच्या पथकाने खुनी जोडप्याच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांना साथ देणारे पोलीस कर्मचारी आणि लॅब अधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. हत्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याचाच वापर केल्याची ही जिल्ह्यातील पहिलीच खळबळजनक घटना आहे.

Tags: