Belagavi

बेळगावमध्ये उद्या रंगणार तृतीयपंथीयांच्या जीवनावरील नाट्यप्रयोग

Share

बेळगावमध्ये उद्या लैंगिक अल्पसंख्याक (तृतीयपंथीय) समुदायाचा संघर्ष आणि स्वप्नांचा प्रवास उलगडणारा ‘तल्की – ट्रुथ ड्रीम’ हा विशेष नाट्यप्रयोग सादर होणार आहे. ‘पयण’ आणि ‘सावली फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने या नाटकाच्या ४४ व्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.

या संदर्भात आज बेळगावमधील पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्या व कलाकार चांदणी यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे नाटक उद्या कुमार गंधर्व हॉल येथे सकाळी ११:३० वाजता सादर होईल. लैंगिक अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या ‘पयण’ संस्थेच्या सह-संस्थापिका चांदणी यांनी २०२१ मध्ये या नाट्यप्रयोगाची सुरुवात केली होती. यापूर्वी दिल्ली, अहमदाबाद, बडोदा आणि म्हैसूर येथील प्रमुख नाट्यमहोत्सवांमध्ये या नाटकाचे ४३ प्रयोग यशस्वी झाले आहेत. या नाटकावर आधारित ‘कन्नडी’ हे पुस्तकही कन्नड आणि इंग्रजी भाषेत प्रकाशित झाले आहे. या नाटकात ५८ वर्षांवरील वयाच्या ज्येष्ठ तृतीयपंथीयांचा सहभाग हे याचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

हे नाटक तृतीयपंथीय समुदायाचे वास्तव, आव्हाने आणि सुख-दुःखाची पाऊले अधोरेखित करते. जितू सुंदरम यांच्या दिग्दर्शनाखाली आणि रेवती यांच्या सह-दिग्दर्शनाखाली होणाऱ्या या नाटकात चांदणी, भानू, लक्ष्मी, शांतम्मा, सरवण, अंदाल आणि अर्धनारीश्वर यांच्यासह इतर कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. बेळगाव जिल्ह्यात लैंगिक अल्पसंख्याकांना सन्मानाचे जीवन मिळवून देण्यासाठी कार्यरत असणाऱ्या सावली फाउंडेशन आणि पयण संस्थेने या विशेष प्रयोगाला उपस्थित राहण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

Tags: