नंदिनी दुग्ध उत्पादनांच्या गुणवत्तेमुळेच के.एम.एफ.ने देशात विशेष स्थान मिळवले असून, दुग्ध उत्पादनातही संघटना दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुधाची गुणवत्ता टिकवून ठेवणे आणि भेसळीला आळा घालणे ही आपली प्राथमिकता असल्याचे के.एम.एफ.चे संचालक आणि वकील विरूपाक्षी ईटी यांनी सांगितले.

चिकोडी तालुका पंचायत कार्यालयात आयोजित दूध उत्पादक संस्थांच्या प्रादेशिक सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, चिकोडी शहरात लवकरच सहा नवीन नंदिनी पार्लर सुरू करण्यात येणार असून, तालुक्यात नवनवीन दुग्ध उत्पादक संस्थांनाही चालना दिली जाणार आहे.

बेळगाव दूध महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकांत म्हणाले की, ४० वर्षांच्या गौरवशाली प्रवासात संस्थेने गुणवत्तेशी तडजोड न केल्यामुळेच आज एवढी मोठी प्रगती झाली आहे. ग्राहकांना शुद्ध दूध आणि शेतकऱ्यांना रास्त भाव मिळवून देणे हे आमचे ध्येय आहे. सध्या दररोज २.५ लाख लिटर असलेले दूध संकलन ५ लाख लिटरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असून, शेतकऱ्यांनी अधिक दूध पुरवठा करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सभेच्या सुरुवातीला के.एम.एफ.चे प्रमुख डॉ. राकेश यांनी प्रास्ताविक केले. उपव्यवस्थापक डॉ. आर. बी. जंबगी यांनी स्वागत केले, तर विस्तार अधिकारी यांनी आभार मानले. या कार्यक्रमास चिकोडी तालुक्यातील विविध दूध उत्पादक संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Recent Comments