Belagavi

मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा; बेळगावच्या मंत्रीपदासाठी दिग्गज नेत्यांमध्ये रस्सीखेच

Share

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा जोर धरू लागली असून, बेळगाव जिल्ह्याला मिळणार असलेल्या मंत्रीपदासाठी तिघा प्रभावशाली आमदारांमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यात आपापल्या निष्ठावंतांना संधी मिळवून देण्यासाठी चढाओढ सुरू असल्याने, बेळगावचे राजकारण आता दिल्लीपर्यंत पोहोचले आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात बेळगाव जिल्ह्याला आणखी एक मंत्रीपद मिळणे जवळपास निश्चित मानले जात आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे आपले अत्यंत जवळचे सहकारी रामदुर्गचे आमदार अशोक पट्टण यांना मंत्रीपद मिळावे, यासाठी मुख्यमंत्री आणि राज्याचे प्रभारी सुरजेवाला यांच्यावर दबाव निर्माण करत आहेत. या आग्रहपणामुळे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासमोर पेच निर्माण झाला असून, हाय कमांडच्या पातळीवर कोणाचे पारडे जड ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे, डी. के. शिवकुमार हे आपल्या निष्ठावंतांपैकी लक्ष्मी हेब्बाळकर किंवा लक्ष्मण सवदी यांना संधी देण्याच्या बाजूने आहेत. महिला व लिंगायत कोटाअंतर्गत संधी मिळवण्यासाठी हेब्बाळकर यांनी आधीच एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. तर दुसरीकडे, आपल्याला दिलेले आश्वासन पूर्ण करावे, अशी मागणी करत लक्ष्मण सवदी यांनीही मंत्रीपदासाठी डी. के. शिवकुमार आणि सुरजेवाला यांच्यावर दबाव वाढवला आहे.

थोडक्यात सांगायचे तर, बेळगावच्या या मंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Tags: