कर्नाटक क्षयरोग आणि तंबाखूमुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाने नवीन संयुक्त कार्यपद्धती जाहीर केली आहे. बेळगावमधील विभागीय कार्यशाळेत अधिकाऱ्यांना या संदर्भात प्रमुख निर्देश देण्यात आले.


आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या राज्य तंबाखू नियंत्रण कक्षाने, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम आणि ‘व्हाइटल स्ट्रॅटेजीज’ संस्थेच्या सहकार्याने बेळगावमधील आयसीएमआर-नीटम संकुलात संयुक्त कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत बेळगाव, विजापूर, बागलकोट, धारवाड, गदग, हावेरी आणि उत्तर कन्नड जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी सहभागी झाले होते. आयसीएमआरचे संचालक डॉ. सुबर्ण रॉय यांनी जिल्हा पातळीवर समन्वय मजबूत करण्याचे आवाहन केले.


कार्यशाळेत क्षयरोग रुग्णांमध्ये तंबाखू वापराची तपासणी करणे आणि ‘आस्क-अॅडव्हाइस-रेफर’ पद्धतीद्वारे तंबाखूमुक्ती केंद्रात पाठवण्यावर भर देण्यात आला. तंबाखू सेवनामुळे क्षयरोगाचा धोका वाढतो आणि उपचारांवरही नकारात्मक परिणाम होतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला. या वेळी जिल्हानिहाय आकडेवारीचा आढावा घेऊन क्षयरोग उपचारासोबत तंबाखू नियंत्रणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय कृती आराखडा तयार करण्यात आला.


Recent Comments