बेळगावमधील सोशल मीडिया माध्यमांवरून कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या घटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने विशेष सायबर सेल कार्यान्वित केला आहे.

बेळगावमधील सोशल मीडिया माध्यमांवरून कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या घटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने विशेष सायबर सेल कार्यान्वित केला असून फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲपवरील संशयास्पद पोस्ट, प्रक्षोभक वक्तव्ये आणि गुन्हेगारांच्या धमकीवजा व्हिडिओंचा शोध घेण्यासाठी चोवीस तास तांत्रिक पाळत सुरू केली आहे. काही व्यक्तींकडून डिजिटल माध्यमांचा चुकीचा वापर करून सामाजिक आणि धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याचे पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाने तांत्रिक देखरेख अधिक मजबूत केली असून समाजात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करणाऱ्यांवर कोणत्याही दबावाशिवाय थेट कायदेशीर कारवाई करण्याचा स्पष्ट संकेत दिला आहे. सायबर सेलचे पथक डिजिटल माध्यमांमधील घडामोडींवर लक्ष ठेवून असून केवळ मूळ मजकूर तयार करणारेच नव्हे, तर कोणतीही चुकीची माहिती किंवा कायदा बिघडवणारा प्रक्षोभक मजकूर फॉरवर्ड करणाऱ्या व्यक्तींनाही कायद्याच्या कक्षेत आणण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे.


Recent Comments