Vijayapura

विजापूरमध्ये अवैध गावठी दारू निर्मिती अड्ड्यांवर कारवाई; तिघांना अटक

Share

विजापूर शहरामध्ये अवैध गावठी दारू आणि ताडी तयार केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासणी मोहीम राबवून तिघांना ताब्यात घेतले आहे.

विजापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक रामनगौडा हट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सकाळी पाच वाजता दहा वेगवेगळ्या पोलीस पथकांनी हरणशिखारी कॉलनीतील सुमारे १० ते १५ ठिकाणी पाहणी केली.

तपासणी दरम्यान मानवी आरोग्यास हानिकारक असणाऱ्या रसायनांचा वापर करून ताडी आणि गावठी दारू तयार केली जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी सुमारे ५०० लिटर कच्चा माल आणि ५० लिटर ताडी जागेवरच नष्ट केली.

पोलिसांनी ३० लिटर तयार अवैध गावठी दारू आणि एक किलो रसायने जप्त केली आहेत. यापुढे कोणत्याही प्रकारचे अवैध व्यवहार आढळल्यास कायद्यानुसार कार्यवाही केली जाईल, अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली.

Tags: