Belagavi

येळ्ळूर परिसरात बस थांब्यासाठी ग्रामस्थांचे आंदोलन

Share

बेळगाव ग्रामीण भागातील येळ्ळूर परिसरातील हणमंतगौडानगर वसाहतीमध्ये बस थांबा मंजूर करावा या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी आज परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांना निवेदन सादर केले.

बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर गावाच्या वेशीवर वेगाने विस्तारत असलेल्या हणमंतगौडानगर वसाहतीमध्ये वाहतूक सुविधेअभावी विद्यार्थी आणि स्थानिकांना रोज त्रास सहन करावा लागत आहे. या भागात महाराष्ट्र हायस्कूल, श्री चांगळेश्वर हायस्कूल यांसारख्या प्रमुख शिक्षण संस्था आणि विवाह कार्यालये असल्याने रोज शेकडो लोकांची ये-जा असते. मात्र, मुख्य रस्त्यावर परिवहन महामंडळाच्या बस थांबत नसल्याने शालेय-कॉलेजचे विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना अनेक किलोमीटर पायी जावे लागत आहे.

या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी हणमंतगौडानगरमधील नागरिकांनी एकत्र येत वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बेळगाव विभागीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले. या वसाहतीमध्ये तातडीने अधिकृत बस थांबा तयार करून सर्व बसना येथे थांबा देण्याचे आदेश जारी करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

याप्रसंगी चंद्रकांत पाटील, अनिल पाटील, दिलीप पाटील, नारायण दळवी, एकनाथ पाटील, महादेव कदम, प्रकाश पाटील, सुशांत पाटील, विनायक पाटील, राजू पाटील यांच्यासह हणमंतगौडानगरमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: