Bagalkot

पाण्यासाठी इळकल नगरपरिषदेला ठोकले कुलूप; नागरिकांचा संताप

Share

बागलकोट जिल्ह्यातील इळकलमध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्येमुळे नागरिकांच्या संयमाचा बांध सुटला आहे. नगरपरिषद अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाचा निषेध करत लक्ष्मी नगरमधील रहिवाशांनी संपूर्ण नगरपरिषद कार्यालयालाच कुलूप ठोकून तीव्र संताप व्यक्त केला.

बागलकोट जिल्ह्यातील इळकल शहरातील लक्ष्मी नगर भागात गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. या समस्येचा निषेध करत संतापलेल्या नागरिकांनी इळकल नगरपरिषद कार्यालयाला कुलूप ठोकून अनोखे आंदोलन केले.

नगरपरिषद कार्यालयात घुसलेल्या आंदोलकांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दालनाबाहेर काढले आणि कार्यालयाच्या मुख्य खोल्यांना कुलूप लावले. तसेच, मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर रिकाम्या घागरी ठेवून नगरपरिषद प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

घटनेची माहिती मिळताच मुख्याधिकारी श्रीनिवास जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. “तुमच्या प्रभागातील पाण्याची समस्या आजच पूर्णपणे सोडवली जाईल” असे लेखी आश्वासन श्रीनिवास जाधव यांनी दिल्यानंतर नागरिकांनी आपले आंदोलन मागे घेतले. जर आज पाणी पुरवठा झाला नाही, तर आगामी काळात नगरपरिषदेसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा कडक इशारा नागरिकांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

Tags: