विजापूरमध्ये जलसंपदा विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची ५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या (एसपी) नावाचा गैरवापर करून फसवणूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

विजापूर जिल्ह्यातील बबलेश्वर तालुक्यातील तिगणी बिदरी गावातील शिवानंद सुरेश अथणी या तरुणाची बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील दुरदुंडी गावातील हनुमंत भजंत्री याच्याशी ओळख झाली होती. हनुमंतने शिवानंदचे वडील सुरेश अथणी यांना विजापूरचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी हे आपले अत्यंत जवळचे मित्र असून आपण त्यांचे पीए असल्यासारखेच काम पाहतो, असा विश्वास दिला. तसेच शिवानंदला जलसंपदा विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले.

विश्वास संपादन करण्यासाठी आरोपीने एसपी लक्ष्मण निंबरगी यांच्या नावाने एक बनावट ईमेल आयडी तयार केला आणि त्यावरून संदेश पाठवून अथणी कुटुंबाचा विश्वास जिंकला. मुलाला नोकरी मिळणार या आशेने सुरेश अथणी यांनी हनुमंतला वेळोवेळी एकूण ५ लाख रुपयांथून अधिक रक्कम दिली. यानंतर आरोपीने शिवानंदला शिवमोगा येथे नेऊन दोन महिने ठेवले आणि वेगवेगळ्या कारणांनी पैशांची मागणी सुरूच ठेवली. अखेर जत्रेसाठी गावी आलेल्या शिवानंदने वडिलांना कोणतीही नोकरी मिळाली नसल्याचे सांगितल्यावर आपली फसवणूक झाल्याचे या कुटुंबाच्या लक्षात आले.
सुरुवातीला पोलीस अधीक्षकांचे नाव असल्याने तक्रार करण्यास घाबरणारे सुरेश अथणी यांनी मित्रांच्या सल्ल्याने अखेर पोलिसांनी धाव घेतली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत विजापूरचे एसपी लक्ष्मण निंबरगी यांनी एका विशेष पथकाची स्थापना करून आरोपी हनुमंत भजंत्रीला अटक केली. तपासादरम्यान या आरोपीने केवळ शिवानंदचीच नव्हे, तर हुबळी, शिवमोगा यांसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून फसविल्याचे समोर आले आहे. तसेच आरोपीने बनावट फेसबुक अकाउंट्स तयार करूनही काहींची फसवणूक केल्याचे उघड झाले असून पोलीस त्याची अधिक चौकशी करत आहेत.
फसवणूक करणाऱ्या या भामट्याने थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांच्याच नावाचा गैरवापर केला होता. सध्या आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याने आणखी किती जणांना अशा प्रकारे गंडा घातला आहे याची माहिती पोलीस गोळा करत आहेत.


Recent Comments