बेळगावमधील मुख्य व्यापारी पेठ असलेल्या गणपत गल्लीत वाहतूक पोलीस आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संयुक्त अतिक्रमण हटाव कारवाई केली आहे.

बेळगाव शहरातील अत्यंत गजबजलेल्या गणपत गल्लीमध्ये वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणांविरुद्ध वाहतूक पोलीस आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी संयुक्त मोहीम राबवली. कारवाई सुरू करण्यापूर्वी अवघ्या १५ मिनिटे आधी अधिकाऱ्यांनी सर्व व्यापाऱ्यांना नियमांचे पालन करण्याचे कडक आदेश दिले होते. पादचाऱ्यांना चालणे सुलभ व्हावे यासाठी रस्त्याच्या कडेला आखून दिलेल्या मर्यादेच्या आतच दुकानाचे साहित्य ठेवण्याची सूचना व्यापाऱ्यांना करण्यात आली होती.

असे असूनही अधिकाऱ्यांनी इशारा देऊन पुढे जाताच काही व्यापाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन केले. त्यांनी आखून दिलेल्या पांढऱ्या रेषेबाहेर येऊन पुन्हा रस्त्यावरच आपली दुकाने थाटली. व्यापाऱ्यांचा हा प्रकार अधिकाऱ्यांच्या तात्काळ निदर्शनास आला. त्यानंतर पथकाने तातडीने घटनास्थळी परतत नियम मोडणाऱ्या व्यापाऱ्यांचे अतिक्रमण पूर्णपणे हटवले. भविष्यात वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर अधिक कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. वारंवार सूचना देऊनही रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांचे साहित्य प्रशासनाने जप्त केले आहे. या मोहिमेमुळे गणपत गल्लीतील रस्ते मोकळे झाले असून वाहतूक सुरळीत झाली आहे.


Recent Comments