बेळगाव महापालिकेत कर्नाटकच्या बाजूने जबरदस्तीने ठराव मंजूर करून घेण्यासाठी हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांनी प्रशासनावर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. यामुळे सीमाभागात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

गेल्या १३ एप्रिल रोजी बेळगाव महापालिकेची बैठक झाली होती. या बैठकीत बेळगाव हा कर्नाटकचाच अविभाज्य भाग असल्याचा ठराव मंजूर व्हावा यासाठी कन्नड संघटनांनी प्रयत्न केले होते. मात्र, हा ठराव संमत होऊ शकला नसल्याने चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सध्या महापालिकेत कन्नड भाषिक महापौर आणि हनुमंत कोंगाळी उपमहापौर पदावर असतानाही हा वादग्रस्त ठराव मंजूर न झाल्याने स्वामीजींनी असंतोष व्यक्त केला आहे. बेळगावच्या संवेदनशील मुद्द्यावर जाणीवपूर्वक राजकारण केले जात असून, महापालिकेने यावर तात्काळ निर्णय न घेतल्यास सर्व स्वामीजींना रस्त्यावर उतरवून आंदोलन केले जाईल, अशी भूमिका चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांनी घेतली आहे. या भूमिकेमुळे बेळगावातील मराठी भाषिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.


Recent Comments