बेळगाव शहरातील टिळकवाडी आणि शुक्रवार पेठ परिसरात सरकारी जागेवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून इमारत उभी करण्यात आली असून, त्याच मालमत्तेवर बँकांकडून कर्ज लाटल्याचा आरोप कर्नाटक रक्षण वेदिकेच्या स्वाभिमानी गटाने केला आहे.


बेळगाव जिल्हा समितीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या तक्रारीनुसार, टिळकवाडी आणि शुक्रवार पेठ भागातील शासकीय जमिनीवर खाजगी व्यक्तींनी कब्जा केला आहे. कोणत्याही परवानगीशिवाय या जागेवर व्यावसायिक संकुले तसेच घरे बांधून त्यांची विक्री केली जात आहे. ही सरकारी मालमत्ता स्वतःच्या नावावर दाखवून बँकांकडून कर्ज घेण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.

संस्थेने अतिक्रमण झालेल्या सर्व्हे नंबर ७८/१ च्या विभिन्न भागांचा संपूर्ण तपशील प्रशासनाला दिला असून, या प्रकरणात सामील असलेले अधिकारी आणि अतिक्रमणधारकांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ही अनधिकृत बांधकामे त्वरित जमीनदोस्त करावीत आणि सरकारी मालमत्तेच्या गैरवापराची सखोल चौकशी करावी, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


Recent Comments