बेळगावमध्ये खळबळजनक ठरलेल्या आदित्यराज कॅपिटल आर्थिक फसवणूक प्रकरणाचा तपास आज अधिकृतपणे सीआयडीकडे सोपवला जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी बेंगळुरूहून डीवायएसपींच्या नेतृत्वाखालील विशेष पथक बेळगावमध्ये दाखल झाले आहे.


शिवम असोसिएट्स फसवणूक प्रकरणापाठोपाठ बेळगावमधील आदित्यराज कॅपिटल संस्थेच्या आर्थिक फसवणूक आरोपाचा तपासही सीआयडीकडे देण्यास शासनाने तयारी दर्शवली आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शासनाला सादर केलेल्या सविस्तर अहवालाच्या आधारे, सीआयडीचे डीआयजी डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्या मार्गदर्शनाखाली हा हायप्रोफाईल तपास सुरू होणार आहे.

दूसरीकडे, शेकडो गुंतवणूकदारांना फसवून गेल्या चार दिवसांपासून गायब असलेला संस्थेचा मालक बाळराज माने हा महाराष्ट्र मार्गे गुजरातला पळून गेल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. फरार मुख्य आरोपी बाळराज माने याच्या शोधासाठी बेळगाव पोलिसांनी जाळे विणले असून, सीआयडीचे पथकही बेळगाव पोलिसांकडून या प्रकरणाची सर्व कागदपत्रे ताब्यात घेऊन फसवणुकीची सखोल चौकशी करण्यास सज्ज झाले आहे.
आदित्यराज कॅपिटल प्रकरणाच्या संदर्भात सोमवारी सिआयडीचे डीवायएसपी रवी एच. यांनी टिळकवाडी पोलिस ठाण्याला भेट देऊन आतापर्यंत झालेल्या तपासाच्या प्रगतीची सविस्तर माहिती घेतली. शिवम असोसिएट्स प्रकरणाप्रमाणेच आदित्यराज कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने देखील नागरिकांना अधिक परताव्याचे आमिष दाखवून हजारो लोकांकडून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी गोळा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सिआयडीच्या अधिकाऱ्यांनी तपासाची चक्रे तीव्र केली आहेत.
खडेबाजार विभागाचे एसीपी शेकरप्पा यांनी सिआयडीचे डीवायएसपी रवी एच. यांना आतापर्यंत झालेल्या पोलिस तपासाची संपूर्ण माहिती दिली आहे. संस्थेचे आर्थिक व्यवहार, ठेवीदारांची संख्या आणि एकूण गुंतवणुकीच्या रकमेचा तपशील सध्या अधिकाऱ्यांकडून तपासला जात असल्याचे समजते. या प्रकरणात आणखी अनेक महत्त्वाच्या बाबी समोर येण्याची शक्यता असून, सिआयडीचे पथक लवकरच मुख्य दस्तऐवज ताब्यात घेणार आहे आणि संबंधितांची चौकशी करण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.


Recent Comments