Belagavi

बेळगाव मधील ‘काहेर’ संस्थेचा १६ वा पदवीप्रदान सोहळा संपन्न

Share

बेळगाव मधील केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च (काहेर) संस्थेचा १६ वा दीक्षांत समारंभ उत्साहात पार पडला. या सोहळ्यात एकूण १,८१० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदकांवर आपले नाव कोरले.

या प्रसंगी पुण्याच्या सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या प्रो-चाँसेलर डॉ. विद्या यरवाडेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पदवी मिळाल्यानंतर आता वैद्यकीय क्षेत्रातील नवीन जबाबदारी सुरू झाली असून विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानासोबतच सामाजिक बांधिलकीने पुढे जावे, असे आवाहन डॉ. विद्या यरवाडेकर यांनी केले.

आरोग्य क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता बदल घडवत असल्याचे सांगत डॉ. विद्या यरवाडेकर यांनी विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा सल्ला दिला. रुग्णांशी उत्तम संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकून घेण्याला डॉक्टरांनी प्राधान्य दिले पाहिजे, अशी प्रतिक्रिया डॉ. विद्या यरवाडेकर यांनी व्यक्त केली.

वर्धा येथील दत्ता मेघे इन्स्टिट्यूटचे कुलगुरू डॉ. ललितभूषण वाघमारे यांनी पालकांच्या कष्टांमुळेच विद्यार्थ्यांना हे यश मिळाल्याचे सांगितले. निरंतर अभ्यासानेच कौशल्य प्राप्त होते, त्यामुळे व्यावसायिक बनतानाच आरोग्याकडे आणि नातेसंबंधांकडे लक्ष द्यावे, असे प्रतिपादन डॉ. ललितभूषण वाघमारे यांनी केले.

या सोहळ्यात अमेरिकेचे ज्येष्ठ युरोलॉजिस्ट डॉ. लिओनार्ड गोमेलो यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीने सन्मानित करण्यात आले. काहेरचे उपकुलगुरू डॉ. संदीप श्रीवास्तव यांनी प्रास्ताविक केले, तर कुलपती डॉ. प्रभाकर कोरे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. एम. पट्टणशेट्टी आणि परीक्षा नियंत्रक डॉ. चंद्र एस. मेटगुड उपस्थित होते.

या दीक्षांत समारंभात एकूण १,८१० विद्यार्थ्यांना पदव्या देण्यात आल्या. यामध्ये ४४ पीएच.डी., २८ पोस्ट-डॉक्टरल, ६९१ पदव्युत्तर आणि १,०१३ पदवी अभ्यासक्रमांचा समावेश होता. एकूण ३४ विद्यार्थ्यांना ४० सुवर्णपदके मिळाली, ज्यात २६ विद्यार्थिनी आणि ८ विद्यार्थ्यांचा समावेश होता.

जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. आदित्य पोरवाल आणि फिजिओथेरपीच्या डॉ. अनास्तासिया ए. कार्व्हालो यांनी प्रत्येकी २ सुवर्णपदके मिळवून आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अविनाश कवी आणि डॉ. नेहा धडेड यांनी केले.

Tags: