विजापूर मध्ये हिजाबला विरोध करत विद्यार्थ्यांना भगवी शाल वाटण्याचा प्रयत्न करणारे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सरकारच्या निर्णयाविरोधात केलेल्या या आंदोलनामुळे येथील दरबार शिक्षण संस्थेच्या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्यास परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवत विजापूर मधील भाजपचे बडतर्फ आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी विद्यार्थ्यांना भगवी शाल वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. विजापूर मधील दरबार हायस्कूल आणि दरबार कॉलेज परिसराच्या बाहेर सकाळपासूनच यत्नाळ यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. हातात भगव्या शाली घेऊन आलेले समर्थक विद्यार्थ्यांना त्याचे वाटप करण्याच्या तयारीत होते, मात्र शैक्षणिक संस्थांच्या परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारी घेत पोलिसांनी या कार्यक्रमाला प्रतिबंध केला. यावेळी समर्थक आणि पोलिसांनी एकमेकांवर जोरदार शाब्दिक चकमक उडवली.

पोलिसांसोबत वाद सुरू असतानाच आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी घटनास्थळी पोहोचून सरकारच्या निर्णयाकडुन निषेध केला आणि घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांना भगवी शाल वाटप करण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी यत्नाळ आणि त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेतले. यावेळी समर्थकांनी पोलीस प्रशासनाविरोधात घोषणा देत तीव्र संताप व्यक्त केला. यत्नाळ यांना पोलीस वाहनातून घेऊन जात असताना काही समर्थकांनी वाहनासमोर बसून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिति नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक बी. लक्ष्मण निंबरगी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आंदोलकांना बाजूला सारून यत्नाळ आणि त्यांच्या समर्थकांना तेथून सुरक्षित स्थळी नेऊन सोडण्यात आले. राज्य सरकारवर सडकून टीका करत हिजाबला परवानगी देण्याच्या निर्णयाचा सरकारने पुनर्विचार करावा, अशी मागणी बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केली.

कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी दरबार शिक्षण संस्थेच्या अवतीभवती चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विजापूर मधील या घडामोडींमुळे राज्यातील हिजाब आणि भगवी शाल हा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



Recent Comments