शिवम असोसिएट्स निलण्णावर प्रकरणानंतर बेळगावमध्ये आणखी एक फसवणुकीचे प्रकरण समोर आले आहे. ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या आदित्यराज कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड संस्थेवर बेळगावचे उपविभागीय अधिकारी शरवण नायक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुरुवारी धाड टाकली.

बेळगावमधील भाग्यनगर येथे या संस्थेचे कार्यालय आहे. कोणतीही पुरेशी सुरक्षा न देता, केवळ जादा व्याजाचे आमिष दाखवून सर्वसामान्यांकडून ठेवी गोळा करणे आणि त्या रकमेची इतरत्र गुंतवणूक केल्याचा आरोप या संस्थेवर आहे. या संदर्भात संस्थेविरोधात केपीआयडी आणि बड्स सेल अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या तक्रारीच्या आधारे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संस्थेच्या कार्यालयाला भेट देऊन कागदपत्रांची तपासणी केली. या कारवाईदरम्यान टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त पुरवला होता.
संस्थेचे आर्थिक व्यवहार आणि ठेवीदारांच्या पैशांचा झालेला वापर याविषयी अधिकाऱ्यांकडून तपास केला जात असून, चौकशीनंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील बलराम माने यांच्या मालकीच्या आदित्यराज कॅपिटल कंपनीवर बेळगावमध्ये नागरिकांना जास्त व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची ठेव गोळा करून फसवणूक केल्याचा गंभीर आरोप आहे. अलीकडेच गाजलेल्या शिवानंद नीलण्णावर फसवणूक प्रकरणाप्रमाणेच हा घोटाळा झाला असून, नागरिकांच्या तक्रारीवरून अधिकाऱ्यांच्या पथकाने कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकला आहे. विशेष म्हणजे, अधिकाऱ्यांनी छापा टाकताच फसवणूक करणाऱ्या या कंपनीने पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आपली अधिकृत वेबसाईट अचानक बंद केली असून, यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


Recent Comments