Chikkodi

कोल्हापूरमधील सिद्धगिरी रुग्णालयात जटिल ‘ब्रेन बायपास’ शस्त्रक्रिया यशस्वी

Share

कोल्हापूरमधील कणेरीमठ येथील सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये अत्यंत गुंतागुंतीची ‘ब्रेन बायपास’ शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.

प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सलग १७ तास परिश्रम घेऊन ही शस्त्रक्रिया पूर्ण केली असून जागतिक वैद्यकीय क्षेत्रात हा एक नवा विक्रम मानला जात आहे. रुग्णाच्या मेंदूतील मुख्य रक्तवाहिनीमध्ये (ICA) मोठी गाठ निर्माण झाली होती, तसेच मेंदूच्या मागील भागातील रक्ताभिसरण पूर्णपणे याच वाहिनीवर अवलंबून होते. अशा प्रकारची शारीरिक रचना जागतिक वैद्यकीय इतिहासात अत्यंत दुर्मिळ मानली जाते. शस्त्रक्रियेदरम्यान थोडी जरी चूक झाली असती, तर रुग्णाचा जीव जाण्याचा मोठा धोका होता. मात्र न्युरोसर्जरी, भूलतज्ज्ञ आणि परिचारिकांच्या उत्तम समन्वयामुळे ही अत्यंत कठीण मोहीम फत्ते झाली आहे.

अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेमध्ये चुकांना अजिबात वाव नसतो. मेंदूच्या शस्त्रक्रियांमध्ये ‘ब्रेन बायपास’ हा शेवटचा पर्याय मानला जातो. डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी यापूर्वी १०० हून अधिक यशस्वी ब्रेन बायपास शस्त्रक्रिया केल्या असून ते या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती आता सुधारत असून या प्रकरणाची नोंद जागतिक वैद्यकीय मासिकांमध्ये घेण्याची तयारी सुरू आहे.

डॉ. मरजक्के यांच्या या कामगिरीमुळे सिद्धगिरी रुग्णालय ब्रेन बायपास शस्त्रक्रियेसाठी देशातील अग्रगण्य केंद्र म्हणून समोर आले आहे. याची दखल घेत ‘न्युरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया’ (NSI) या संस्थेने आगामी १३ आणि १४ जून रोजी राष्ट्रीय ब्रेन बायपास शस्त्रक्रिया कार्यशाळेचे यजमानपद सिद्धगिरी रुग्णालयाला दिले आहे. ग्रामीण भागातील एका धर्मादाय रुग्णालयाला असा मान मिळण्याची ही पहिलीच वेळ असून याद्वारे देशातील तरुण डॉक्टरांना प्रगत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Tags: