Belagavi

बेळगाव बार असोसिएशनचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Share

अथणीमधील सत्ती गावात झालेल्या जातीय संघर्षानंतर पोलिसांनी एका निष्पाप वकिलाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बेळगाव बार असोसिएशनने तीव्र संताप व्यक्त केला असून दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

अथणीमधील सत्ती गावात जातीय संघर्षानंतर उद्भवलेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी बालकृष्ण क्लिनिकसमोर बसलेले वकील मल्लिकार्जुन कोरी यांना जमावातील व्यक्ती समजून बेदम मारहाण केली. आपण वकील असून या वादाशी काहीही संबंध नसल्याचे त्यांनी वारंवार सांगूनही पोलिसांनी त्यांचे ऐकले नाही. या घटनेत वकिलाचा छळ करत त्यांच्या व्यवसायाचा अवमान करण्यात आला असून, या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज सध्या समाजमाध्यमांवर प्रसारित झाले आहे.

राज्यात ‘वकील हिंसाचार प्रतिबंधक कायदा’ लागू असतानाही पोलिसांकडून झालेल्या या अमानुष कृत्यामुळे बेळगाव बार असोसिएशनने तीव्र संताप व्यक्त केला आहे. असोसिएशनचे सरचिटणीस सचिन आर. शिवण्णावर यांनी या घटनेचा निषेध करत संबंधित पोलीस उपनिरीक्षक व कॉन्स्टेबलना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून न्याय मिळवून देण्यासाठी बार असोसिएशनच्या वतीने मुख्यमंत्र्यांसह पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन पाठवण्यात आले आहे.

Tags: